साकळं... भाग-1

साकळं....

भाग-1 

           सर्वत्र अंधार पसरला होता. त्या अंधाराला चिरत राज आपली वाट काढत होता. वाट नेईल त्या दिशेने तो चालत होता. कुठे जायचे अन् कुठे नाही ? त्याला काही सुचत नव्हते. त्याचा शरीर खूप थकला होता. रानवाटेत एका वटवृक्षाचा आधार घेऊन तो बसला. सकाळपासून पोटात अन्नाचा एक कण सुद्धा गेला नव्हता. क्षीण झालेल्या तणा-मनानं आकाशातल्या चांदण्यांकडे डोळे टवकारून तो बघत होता.


    "काय दोष होता माझा ?

     का हा भोग माझ्या नशिबाला आला ?

     का ?

     का मला असा जन्म मिळाला ?"


राहून-राहून त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता.

आत्महत्या !

होय. आत्महत्या .

    "जगू तरी कोणासाठी ?

     कोण आहे माझा ?

     आई ?

     वडील ?

     बहिण-भाऊ ?

     कोण आहे ?

     .... कोणीही नाही."


घरच्यांची आठवण करत तो बसला होता.

    "का रडतो मी त्याची आठवण करून ?

     कोण होतो मी त्यांच्यासाठी ?

     गावातील पाटीलांचा एकुलता एक मुलगा ?

     छे !

     देवीचा प्रसाद..... ?"


त्या वटवृक्षाला तसाच टेका देऊन राज बसला होता. आपल्या जीवनाचा एक-एक पान पालटून वाचत होता.


                   - माझे वडील गावातील पाटील. गावात बाबांना खूप सन्मान.

'....बाबा ?'

त्यांच्या शब्दाला कोणीही आडवे येण्याची हिम्मत करीत नव्हते. त्यांना पाहूनच लोकांची थरकाप होत होती. पाटीलांनी गावात तसा दरारा बनवून ठेवला होता. पाटीलांच्या घरात कशाचीही कमी नाही. ऐश्वर्य त्यांच्या पायाखाली लोळत होते. 

   पाटील कठोर तर पाटलीन अगदी मायाळू स्वभावाची. दया, ममत्व मनी शिघोशिघ भरलेलं. पाटलीन देवी यल्लमा मातेची खूप मोठी भक्त. 

            यांच्या तीन कन्यारत्न. कशाचीही कमी नव्हती, पण पाटीलांना 'वंशाचा दिवा' हवा होता. पुत्ररत्न पाहिजे होता. पाटीलकी टिकविण्यासाठी एक उत्तराधिकारी हवा होता. पहिली मुलगी झाली, तेव्हा पहिला बाळ आहे म्हणून सर्व खुश होते. दुसऱ्यांदा मुलगी झाली, तेव्हा मात्र थोडी निराशा त्यांना आली. तिसऱ्यांदा पण मुलगीच झाली. पाटीलांचा संताप वाढला. पुत्र प्राप्तीसाठी पुजा-पाठ, हवन, साधू-बुवांचे दर्शन, सर्व सर्व करण्यात आले. कशाचीही कमी राहिली नव्हती. त्यांना फक्त एक वंशाचा दिवा पाहिजे होता. 

         पाटलीनबाईंची यल्लमा मातेवर खूप आस्था होती. शेवटी त्यांना यल्लमा देवीची आठवण झाली. त्यांनी येल्लुमाईला साकळं घातलं.


        " माते तुझी मी सेवाभावाने आराधना करते, तूझ्या पुजा-अर्चेत कशाचीही कमी राहू देत नाही. माते मला कोणत्याही गोष्टीची कमी नाही, पण एक पुत्र माझ्या पदरात घाल आई. आपल्या या लेकीला एक पुत्ररत्न दे माते. मी तुला वचन देते की, मला पुत्र झाला तर मी त्याला तुझ्याच स्वाधीन करणार. माझी ही एकच मनोकामना पूर्ण कर माते. येल्लुआई तुझा आशीर्वाद दे माते."

असे साकळं बोलून पाटलीनने नारळ फोडलं.


         त्यानंतर जन्म झाला राजनाथ पाटीलांचा. म्हणजे मी. लाडाने सर्व मला राज म्हणत. खूप लाडाने-प्रेमाने मला सर्व जपत. मी सदैव आईच्या डोळ्यासमोर पाहिजे होतो म्हणून ती मला कधीही बाहेर खेळायला जाऊ देत नव्हती. माझे तिघ्याही बहिणींसोबत हसत-खेळत दिवस जात होते. 

    आई रोज यल्लमा देवीची पूजा करतांना मलाही पूजेला घेऊन बसे. आईसोबत मी पण भक्तीमध्ये रंगून जात असे. माझीही यल्लमा मातेवर आस्था होती. यल्लुमाईचा भंडारा कपाळावर लावून तिचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या दिवसाची सुरुवात करत होतो.



क्रमशः

✒️अमित♎

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्याह तरंग